पुणे – वाहतूक पोलिसांनी एका महिन्यानंतर पुन्हा एकदा शहरात वाहतूक नियमनाबरोबरच टोइंगची कारवाई देखील सुरू केली आहे.
नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत त्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहिल्या दिवशीच पोलीस चौका-चौकात ऍक्शन मोडमध्ये दिसून आले. नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे, असे अवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
उचल रे ती गाडी… या “मुड’मध्ये असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक पोलिसांना कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, नियभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते. पण, त्यानंतर चौकातून पोलीस गायब झाल्याचे चित्र होते.
कारवाई नाही तर वाहतूक नियमन नाही, अशीच काही दिवस वाहतूक पोलिसांची भूमीका दिसत होती. पण, वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर महत्वाच्या चौकात पोलीस दिसू लागले. मात्र, तरीही म्हणावे असे नियमन होताना दिसत नव्हते. तसेच, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे फावत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत होता.
त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर पुन्हा टोइंग कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. वाहतूक नियमनाकडे लक्ष देण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. टोइंग कारवाईबद्दल तक्रार येणार नाही, याची काळजी घ्या. तसेच, वाहन चालकांवर थकलेला दंड वसूल करण्यावर भर दिला जाणार आहे.
तुरुंगवास टाळायचा असेल तर जरा जपून करा फेसबुकचा वापर !
हे नियम पाळावेत…
- टोइंग वाहनांवर सीसीटीव्ही सुरू ठेवावेत
- वाहनांमध्ये नोंदवही ठेवावी
- टोइंग कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी थेट संपर्क करायचा नाही
- वाहने उचलताना चित्रीकरण करावे.