पुणे – शहरात रस्ते तयार करताना केवळ वाहतुकीचा विचार न करता, हे रस्ते पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर पाऊल उचलले आहे. त्यामुळे भविष्यात विकसित होणाऱ्या रस्ते कामात कचऱ्यातील प्लॅस्टिकचा वापर केला जाणार आहे. याशिवाय शहरात निघणारा राडारोडाही रस्ते पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. परिणामी, या रस्त्यांची गुणवत्ता वाढणार असून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा फेरवापरही होणार आहे.
छोट्या-मोठ्या रस्त्यांचे डांबरीकरणामध्ये आता प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढणार असून, कचऱ्याचा फेरवापरदेखील होणार आहे. तसेच पुणेकरांना अशा रस्त्यांमुळे खड्ड्यांपासून दिलासाही मिळणार आहे. पथ विभागाकडून शहरात चार ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करून डांबरीकरण करण्यात आले होते. यापुढे प्रत्येक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्लॅस्टिकचा वापर बंधनकारक केला आहे. घनकचरा निर्मूलन विभागाकडे प्लॅस्टिक तुकडे तयार करण्याचे प्लॅंट आहेत. त्याचाच वापर डांबरी रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे.
पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी नव्या रस्त्यांवर “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रम राबवला जाणार आहे. रस्त्याकडेचे पदपथ आणि पावसाळी वाहिन्यांचा वापर करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाय शहरात तीन चार प्रमुख रस्त्यांचे काम करताना जुन्या विहिरी आढळल्या असून, या विहिरींचे पाणीही झाडांसाठी वापरण्यात येणार आहे.
झाडे घेणार मोकळा श्वास
रस्त्याची कामे करताना आता झाडांचाही विचार केला जाणार आहे, कॉंक्रीटचे रस्ते करताना झाडांच्या खोडाला पेव्हिंग ब्लॉकचा विळखा घातला जातो. यापुढे झाडांच्या खोडाच्या आकारानुसार शास्त्रोक्त पद्धतीने झाडाच्या मुळांना पाणी जाईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. या झाडांसाठी पाण्याची व्यवस्थाही केली जाणार असून नियमितपणे त्यांची देखभाल केली जाणार आहे.
“…मग 25 वर्षे गप्प का बसलात”; केदार दिघे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल
माती परीक्षणही करणार
रस्ते विकसित करताना राडारोड्याचा वापर केला जाणार आहे. यासाठी मातीचे परीक्षण करून हा राडारोडा रस्त्याच्या पायासाठी वापरण्यात येणार आहे. या राडारोड्यामुळे पर्यावरणास नुकसान होणार नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे रस्ते खोदाईनंतर निर्माण होणाऱ्या मातीची समस्या सुटण्यासही मदत होणार आहे.