कृषी पर्यटन केंद्रांकडे पर्यटकांचा ओढा

नितीन साळुंखे

जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची होतेयं गर्दी

स्थानिकांना रोजगाराची उपलब्धता

सध्या जिल्ह्यातच काय तर राज्य अन्‌ देशातही मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुण तसेच काही आधुनिक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्रासारखे प्रयोग राबवतून आपल्या रोजगाराचा प्रश्‍न स्वत:च निकालात काढत इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तसेच तरुण पिढीने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही कृषी पर्यटन केंद्राच्या मालकांकडून सांगितले जात आहे.

नागठाणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्षाने पावण झालेल्या सातारा जिल्ह्याला ज्या प्रमाणे ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तसाच वारसा पर्यटन स्थळांचाही लाभला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे उन्हाळ्याचे दिवस वगळता या सर्व पर्यटनस्थळांवर नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. मात्र आता जिल्ह्यात साकारण्यात येत असलेल्या कृषी पर्यटन केंद्रांमुळे ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांची पावले साताऱ्याच्या दिशेने वळत आहेत. जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांचा कृषी पर्यटन केंद्रांकडे सध्या चांगलाच ओढा वाढलेला आहे.

गत काही वर्षांपासून सातारा जिल्हा हा पर्यटनांचा जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आला आहे. पाचगणी-महाबळेश्‍वर, कास, ठोसघर, कोयना यासह विविध नावाजलेली पर्यटनस्थळे सातारा जिल्ह्यात असतानाच आता जिल्ह्यात नव्याने सुरु झालेल्या कृषी पर्यटनकेंद्रांमुळे ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओढा सातारा जिल्ह्याकडे वाढत आहे. सातारा तालुक्‍यातील बोरगाव येथील जानकी कृषी पर्यटन केंद्र हे सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात जानकीप्रमाणे आणखीही कृषी पर्यटन केंद्रे असून त्याठिकाणीही पर्यटकांची गर्दी होतान दिसत आहे.

उन्हाळ्यातील एखाद-दुसरा महिना वगळता नेहमीच जिल्ह्यातील पर्यटन केंद्रे ही पर्यटकांनी गजबजलेली असतात. दरम्यान, पाचगणी-महाबळेश्‍वर ही थंड हवेची ठिकाणे असल्याने उन्हाळ्यातही या ठिकाणी गर्दी असते. मात्र, इतर पर्यटनस्थळांवर सध्या शुकशुकाटच आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी कृषी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. आता ही कृषी पर्यटन केंद्रे चांगलीच नावारुपाला आली असून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यापैकीच सातारा तालुक्‍यातील बोरगाव येथील जानकी कृषी पर्यटन केंद्र हे एक आहे. ग्रामीण जीवनशैली जोपासणाऱ्या जानकी कृषी पर्यटन केंद्रात सध्या ग्रामीण भागासह शहातील विशेषत: पुण्या, मुंबई बरोबरच कोल्हापूरसह कोकणातून पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत.

याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात निसर्गाचा आस्वाद घेता येत आहे. त्याचबरोबर बोटिंग, झुलता पूल, स्विमिंग टॅंक, जीपमधून शिवार फेरी, बैलगाडीतून शिवार फेरी, ट्रॅक्‍टरमधून शिवार फेरीचाही आनंद घेता आहे. तसेच वॉटर पार्क लहानांसह मोठ्यांसाठी तयार करण्यात आलेले भव्य स्लाईड, रेन डान्सही भुरळ घालत आहेत. विशेष म्हणजे शाकाहारी, मांसाहारी जेवणाची तसेच राहण्याची उत्तम माफक दरात योग्य सोयदेखील कृष्णी पर्यटन केंद्राच्यावतीने करुन देण्यात आली आहे. याशिवाय कौटुंबिक समारंभ, पार्टी, रिसेप्नश, कॉन्फरन्स मिटिंग, गेट-टुगेदर, शैक्षणिक सहाली व त्यासाठी खास मॅजिक शो देखील या ठिकाणी पहावयास मिळतात. एकंदरीतच हिवाळा आणि पावसाळ्यात ज्या प्रमाणे जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ असते ती वर्दळ उन्हाळ्याच्या दिवसात कमी झालेली पहावयास मिळत होती मात्र या पर्यटन केंद्रांमुळे उन्हाळ्यातही पर्यटकांची वर्दळ जिल्ह्यात कायम राहिलेली दिसत आहे.

ग्रामीणशैलीचा बाज टिकण्यास हातभार

कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांना शिवार फेरीचा अनुभव देण्यात येत आहे. यामध्ये ट्रॅक्‍टर तसेच बैलगाडीतून पर्यटकांना शेतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पिकांची माहिती दिली जात आहे. तसेच ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडविले जात आहे. चुलीवरील बनविल्या जाणाऱ्या जेवणाचा आनंद पर्यटकांना दिला जात आहे. एकंदरीतच या सर्वातून ग्रामीण जीवनशैलीचा बाज टिकविण्यास कृषी पर्यटन केंद्रांचा हातभार लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here