पुणे/खडकवासला – खडकवासला धरण परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, तरीही पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील काही हौशी पर्यटक पोलिसांना चकवा देत नदी पर्यटनाची हौस भागवून घेत आहेत. अर्थात येथे करोना प्रतिबंधक नियमांना डावलले तर जात आहे. शिवाय सध्याची पाणीपातळी लक्षात घेता दुर्घटनेची भीती आहे.
गेल्या महिन्यापासून पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरण येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी या ठिकाणी दोन ते चार पोलीस कर्मचारी असायचे, मात्र यंदा गर्दी टाळण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त आहे. पर्यटकांना खडकवासला धरणावर जाण्याची परवानगी नाही.
मात्र, पुणे आणि पुणे परिसरातील असंख्य पर्यटक खडकवासला धरणावर मौजमजा करण्यासाठी येत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पर्यटनस्थळे व धरणांवर जाण्यासाठी बंदी आहे. तरीही, पोलिसांची नजर चुकवून पर्यटक नदीच्या परिसरात मौजमजा करताना दिसतात.
खडकवासला धरणाच्या पाणलोट परिसरात अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. खडकवासला धरणाचे पाणी सध्या वाढले असल्याने पर्यटकांना पाण्यात न उतरण्याच्या अवाहन हवेली ग्रामीण पोलिस यांनी केले आहे. तरीसुद्धा पर्यटक या आव्हानाला न जुमानता पाण्यात उतरतात. शिवाय, नदी परिसरात खाद्यपदार्थ विक्रीलाही सध्या बंदी आहे. तो आदेशही काही ठिकाणी डावलला जात आहे.
खडकवासला :बंदी असतानाही काही पर्यटक नदीत फिरत आहेत. याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. तर, पोलीस फक्त मुख्य रस्त्यावर गस्त घालत आहेत.