मंबई – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने काश्मीर प्रीमिअर लीग स्पर्धा आयोजित करून भारताच्या भूमिकेलाच आव्हान दिले आहे. ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू हर्षल गिब्ज व पाकिस्तानचा माजी कसोटीपटू शाहीद आफ्रीदी यांची चिडचिड झाली आहे.
बीसीसीआयच्या या भूमिकेवर त्यांच्यासह पाकिस्तान मंडळानेही टीका केली असून, आयसीसीच्या धोरणांचीच पायमल्ली केली जात असल्याचाही आरोप केला आहे. काश्मीर प्रीमियर लीगबाबत बीसीसीआय क्रिकेट आणि राजकारण यांची गल्लत करत असून, काश्मीर व पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी केवळ ही एक स्पर्धा आहे.
आयसीसीच्या अनेक सदस्यांना या लीगपासून दूर करण्याचा प्रयत्नही बीसीसीआयने चालवला आहे. हे क्रिकेटसाठी अत्यंत निराशाजनक असल्याचीही टीका पाक मंडळाने केली आहे.
काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी न होण्यासाठी बीसीसीआयने धमकीच दिली असल्याचे गिब्जने म्हटले होते. त्याला समर्थन देताना आफ्रीदीनेही टीका केली आहे.
मात्र, दुसरीकडे याबाबत कोणताही समझोता केला जाणार नाही. ही लीग अनधिकृतच आहे अशी ठाम भूमिका बीसीसीआयने घेतली असून, त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळात तेढ निर्माण होणार आहे. सौरव गांगुली आणी अन्य सदस्यांनीही गिब्जला क्रिकेटशी संबंधित कोणत्याही कामाबाबत भारतात पायही ठेवू देणार नाही,
अशी भूमिका घेत आपले कट्टर देशप्रेम दाखवले असून, त्यामुळेच गिब्जसह आफ्रीदी व पाक मंडळाची चिडचिड झाली आहे. पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये ही लीग घेतली जाणार असून, ती अनधिकृतच असल्याचे बीसीसीआयने सांगितले असून, आपली भूमिका बदलली जाणार नाही, असेही व्यक्त केले आहे.