पाटण मतदारसंघात पाच वर्षांत 1766 कोटींची कामे मार्गी

आ. शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती

कराड – पाटण तालुक्‍याच्या विकासासाठी 2014 ते 2019 या कालावधीत तब्बल 1 हजार 766 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात देखील 108 कोटी रुपयांच्या कामास मंजूरी मिळणार असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण येथे आज मागील पाच वर्षांच्या विकासकामांच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्‍यात विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहोत. मागील टर्ममध्ये आमचे सरकार नसताना देखील आम्ही मतदारसंघात 217 कोटी रुपयांची कामे केली. या टर्ममध्ये विधिमंडळातील आयोगाचा उपयोग करून पाटणसाठी जास्तीत-जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले. यात आम्हाला चांगले यश आले.

या पाच वर्षात तब्बल 1 हजार 766 कोटी रुपयांचा निधी पाटणच्या विकासासाठी प्राप्त केला. पाटणमधील 14 पंचायत समिती गण व कराड तालुक्‍यातील सुपने गण अशा पंधरा गणात विविध विकासकामे मार्गी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख व आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातल्याने एवढा मोठा निधी पाटणसाठी आणण्यात मला यश आले, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.

आ. देसाई पुढे म्हणाले, पाटणमधील अजूनही काही कामे प्रलंबित आहेत.
2019-20 या आर्थिक वर्षात 108 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मतदार संघातील या कामांचा देखील पाठपुरावा सुरू असून आचारसंहितेच्या पूर्वी ही कामे मंजूर करून घेणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाटण मतदारसंघात निधी मिळाल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.