पुणे – महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड कार्यालय कायमस्वरूपी बंद करून बोर्डाकडील कर्मचारी व योजना या महिला व बाल विकास विभागांतर्गत इतर कार्यालयांत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डाच्या कर्मचारी यांच्या वेतनासाठी ६३ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुख्यालयातील सध्या कार्यरत १९ कर्मचारी यांचे वेतन व २१ सेवानिवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन, तसेच केंद्र हिश्श्याच्या वेतनेतर बाबींवरील खर्च राज्य शासनातर्फे भागविण्यास जानेवारी २०२४ मध्येच मान्यता दिली आहे. सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चासाठी १ कोटी ८१ लाख रुपये निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.
एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीसाठी लेखानुदान मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड प्रभारी अधिकारी तथा महिला व बाल विकास आयुक्त यांनी निधीची मागणी केल्यानुसार महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील कर्मचारी यांच्या जुलै, २०२४ पर्यंतच्या वेतनावरील खर्चासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यता देण्यात आलेली आहे.