टोकियो – करोना विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे यंदा जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली जाण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिले आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनीच समितीशी चर्चा केली असून ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याची तयारी दर्शविली आहे. या स्पर्धेच्या क्रीडाज्योतीची फेरी लवकरच होणार असून मंगळवारी त्याची रंगीत तालीम करण्यात आली. करोनाचा धोका असूनही ही रंगीत तालीम पाहण्यासाठी अनेक अतिशहाणे रस्त्यांवर गर्दी करून उभे होते.
चीनसह जगभर पसरत करोनाच्या धोक्यामुळे अनेक देशांत भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी सुरू केली आहे. याचाच एक फटका कॅनडाच्या रूपाने ऑलिम्पिक समितीला बसला आहे. कॅनडाने या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडनेही स्पर्धेतून अंग काढून घेण्याचा इशारा दिला आहे. भारताने अद्याप जरी आपला निर्णय घेतलेला नसला तरीही भारतातही अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा लांबणीवर टाकावी अशी मागणी केली आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मात्र, आता त्यात बदल होणार असल्याचे संकेत आयओसीचे सदस्य डिक पौंड यांनीच दिले आहेत.
ही स्पर्धा यंदा होणार नाही ही मलाही शक्यता वाटत असून पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये साधारण मे महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान जपान आहे. या स्पर्धेसाठी गेली काही वर्षे जपानने प्रचंड आर्थिक गुंतवणूकही केली आहे, त्यामुळे ही स्पर्धा रद्द केली तर देशाचे अतोनात नुकसान होणार आहे, त्यामुळे या देशाला दहा वर्षे मागे जावे लागण्याचा धोका आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा पुढील वर्षी घेणेच चांगले ठरेल, असेही त्यांनी व्यक्त केले. स्पर्धा पुढे ढकलण्यास आमची हरकत नसेल, असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते.