लोकशाहीचा आज महोत्सव

प्रशासन सज्ज; तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप

नगर – लोकशाही महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आज ज्या त्या विधानसभामतदारसंघाच्या ठिकाणी मतदान साहित्य घेवून अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रात पोहोचले असून उद्याच्या लोकशाही महोत्सवात मतदारांच्या मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. 2 हजार 30 मतदान केंद्रावर 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. आज सकाळीपासून तहसील कार्यालयामध्ये जत्रेचे स्वरूप आले होते.

बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मतदान केंदावर घेवून जाण्यासाठी एसटीबसची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारीच मतदान साहित्य व अधिकारी व कर्मचारी बसने मतदान केंद्रावर पोहोचले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू होती. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मंगळवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 30 मतदान केंद्र आहेत. हे मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी दक्षता घेतली आहे. यासाठी 8 हजार 932 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाची करडी नजर असणार आहे.

या केंद्रांवर कसल्याही प्रकारचा गोंधळ घडू नये, यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी मतदान साहित्याचे वाटप केले. खास उभारण्यात आलेल्या मंडपात अतिशय शिस्तबद्धरीत्या मतदान केंद्राध्यक्षांकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. मतदान यंत्र (बॅलेट मशिन), उमेदवारांच्या चिन्हांकित याद्या, पेपर सील, पट्टी सील, स्पेशन टॅग, ग्रीन सिग्नल, पितळी सील, स्टेशनरी साहित्य आदी वस्तू देण्यात आल्या. दरम्यान, दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत 18 लाख 54 हजार 248 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 2030 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून, त्या ठिकाणी 4263 बॅलेट युनिट, 2436 कंट्रोल युनिट व 2639 व्हीव्हीपॅट व्यवस्था करण्यात आली आहे.

192 मतदान केंद्रांवरुन लाईव्ह वेबकास्टिंग
लोकसभा निवडणुकीत लाईव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघात 192 मतदान केंद्रांवरुन मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामध्ये शेवगाव 37, राहुरी 30, पारनेर 25, नगर 30, श्रीगोंदा 34, कर्जत- जामखेड 36 मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. तर 152 मतदान केंद्रावर सूक्ष्म निरिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्र
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असून शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात 10 मतदान केंद्रावर महिला त्या मतदान केंद्रांचे संचलन करणार आहेत. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. शेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 133 – जिल्हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र.50- नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.184- पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर, नगर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.171- अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.172 अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.255 आयकॉन पब्लिक स्कुल चाहुराणा बु., मतदान केंद्र क्र.256 आयकॉन पब्लिक स्कुल चाहुराणा ब्‌ु. श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र.247 श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र.106 जामखेड ल.ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. 194 जिल्हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा सखी मतदान केंद्रात समावेश आहे.

ओळखपत्रासह 11 फोटो ओळखपत्र आवश्‍यक
मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी इतर 11 पर्यायी दस्तावेज ग्राहय धरण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे, नागरिकांनी मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम ह्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, बॅंक, पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदानावेळी सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 18 लाख 54 हजार 248 मतदार आहे. त्यात शेवगावमध्ये 3 लाख 38 हजार 788, राहुरी- 2 लाख 88 हजार 127, पारनेर 3 लाख 17 हजार 8, नगर शहर- 2 लाख 85 हजार 913, श्रीगोंदा 3 लाख 93 हजार 24, कर्जत-जामखेड- 3 लाख 15 हजार 88.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.