मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल….आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही “धन”से कमी आहोत पण “मन”से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय, आदर घ्या,” असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. मनसेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?”, अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला होता.
यावर कल्याणमधील मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट शरद पवार यांना ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलेआहे की, “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल….आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही “धन”से कमी आहोत पण “मन”से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय आदर घ्या.” असे त्यांनी म्हटले आहे.