नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी आईची गुजरातमध्ये जाऊन भेट घेती आहे. आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. सध्या पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटी रुपयांच्या योजनाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.15 वाजता पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर रात्री 11.30 वाजता मोदी हेरिटेज फॉरेस्टलाही भेट देतील.
Took blessings of my mother today as she enters her 100th year… pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
पंतप्रधान आज दुपारी 12:30 वाजता वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान 21,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन गुजरातला मोठी भेट देणार आहेत. आज गुजरात गौरव अभियानादरम्यान पंतप्रधान 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचं लोकार्पण करण्यात येईल.
तसेच, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमस्थळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.