पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा आज (रविवार) कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहराच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनांचा जोरदार धडाका लावला आहे. आजही विविध प्रभागात विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करण्यात येणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या गोंधळामुळे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे उद्या (सोमवार) पासून महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे. रविवार हा विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळातील शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या वतीने विकास कामे आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. आज महापौर माई ढोरे, आमदार, भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर नानी घुले, स्थायी समितीचे सभापती ऍड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके आदींच्या हस्ते उद्घाटने आणि भूमिपूजने होणार आहेत.
पुणे नाशिक मार्गाजवळील लांडेवाडी येथील कमानीचे उद्घाटन, संत ज्ञानेश्वर भाजी मंडई आणि व्यापारी संकुलाचे उद्घाटन, सहल केंद्रातील फिश ऍक्वेरियम कामांचे भूमिपूजन होणार आहे. वडमुखवाडी येथे जलतरण तलावाचे उद्घाटन, श्री वाघेश्वर महाराज उद्यान, चऱ्होलीतील इंद्रायणी धाम स्मशानभूमीचे उद्घाटन, बुर्डे वस्ती येथील 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, प्राईड सिटीतील जलकुंभाचे भूमिपूजन आणि श्री वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवीतील विरंगुळा केंद्राचे उद्घाटन, जिजाऊ उद्यान जॉगिंग ट्रकचे उद्घाटन, कासारवाडीतील बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन, इंद्रायणीनगर येथील विरंगुुळा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.