नाट्य-चित्रपट, अभिनते, गायक व दानशूर वृत्तीचे चंद्रकांत गोखले यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1921 रोजी मिरज येथे झाला. त्यांचे वडील रघुनाथ व आई कमलाबाई हे दोघेही गायक-नट म्हणून रंगभूमीवर काम करीत असत. त्यांच्या मातोश्री कमलाबाई या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकारांपैकी एक होत्या. त्यामुळे चंद्रकांत यांना अभिनयाचे, गायनाचे धडे बालपणापासूनच मिळाले होते. घरची गरिबी असल्याने चंद्रकांत गोखले यांना शालेय शिक्षण घेता आले नाही.पण त्यांच्या आईनेच त्यांना घरातच मराठी व हिंदी भाषा शिकविल्या तसेच संगीताचे प्राथमिक धडेही दिले.
त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी “पुन्हा हिंदू’ या नाटकात छोटी भूमिका करून रंगमंचावर पाऊल ठेवले. त्यानंतर मराठी रंगभूमीवर भूमिका करता करता बळवंत संगीत मंडळीमध्ये प्रमुख भूमिका करणारे मा. अविनाश व मा. दीनानाथ मंगेशकर यांचे गाणे ऐकून एकलव्याप्रमाणे ते आत्मसात केले, त्यांना ते मनोमन आपले गुरू मानायचे. “चला राघव चला पहा ही जनकाची मिथिला’ हे गीतरामायणातील गीत त्यांनीच गायले आहे.
सुरुवातीला काही काळ मराठी नाटकांत त्यांनी स्त्री भूमिका केल्या व नंतर पुरुष भूमिका करायला सुरुवात केली. रंगभूमीवरील 75 वर्षांच्या कालखंडामधे त्यांनी नाटकातून विविध भूमिका केल्या. कुलवधू, राणीचा बाग, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष, नटसम्राट, सिंहासन, झुंझारराव वगैरे एकूण 64 नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. श्री. ना. पेंडसे यांच्या “हद्दपार’ या कादंबरीवरून केलेल्या “राजे मास्तर’ या नाटकातील राजे मास्तरांची मुख्य भूमिका चंद्रकांत गोखले यांनी वठविली. जयवंत दळवी यांच्या “बॅरिस्टर’ या नाटकातील तात्याची छोटी पण खलनायकाची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. ग्रामीण, क्रूर, दारुडा व लंपट असे व्यक्तिमत्त्व त्यांनी प्रभावीपणे साठविले होते.
शिरवाडकरांच्या “नटसम्राट’ या नाटकातही काही काळ वृद्ध आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका नव्या संचात यशस्वी करून दाखवली. त्यांनी स्त्री-सबलीकरणाचे महत्त्व विशद करणारी “पुरुष’ या जयवंत दळवी लिखित नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका केली.
नाट्यक्षेत्रात केलेल्या भूमिकेबद्दल चंद्रकांत गोखले यांना नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मा. दीनानाथ यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार लाभले. त्याखेरीज अनेक संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळाले. चित्रपटासाठी त्यांना “सुवासिनी’, “स्वप्न तेच लोचनी’, “धर्मकन्या’ व “ईर्षा’ या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळाली.
त्यांनी कारगिल जवानांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला व आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड व सदर्न कमांड पुणे यांच्याकडे तेवढेच पैसे देणगीदाखल दिले. देशाची सेवा करता करता अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी “क्वीन मेरीज् टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स’या संस्थेला बॅंकेतील मुदत ठेवीच्या व्याजापोटी येणाऱ्या एक लाख रुपयांचा धनादेश आपली आई कमलाबाई व पत्नी हेमा यांच्या स्मरणार्थ दर वर्षी देण्याचा मानस केला. 20 जून 2008 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी गोखले यांचे पुणे येथे निधन झाले.