pune news : अयोध्या येथील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा क्षण जवळ येवून ठेपला आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्या मतदारसंघासह शहरात विविध उपक्रम घेत आहेत. या अंतर्गत दिग्दर्शक-अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या खिशाला प्रभू श्रीरामाची प्रतिमा (बॅच) लावत त्यांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या.
निमित्त होते दक्षिण पुण्यामध्ये वैचारिक देवाण-घेवाणीचे व्यासपीठ ठरलेल्या ऐश्वर्य कट्ट्यावर झालेल्या विविध नामवंतांच्या भेटीचे. श्रीराम हे कोण्या एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे नाहीत. श्रीराम आपल्या सर्वांचे आहेत, अशी भूमिका घेवून आमदार रवींद्र धंगेकर यांनी अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
‘एक दिवा आपल्या श्रीरामासाठी’ असा दीपोत्सवाचा अनोखा उपक्रम आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात नुकताच आयोजित केला होता. यात उत्स्फूर्तपणे असंख्य रामभक्त नागरिक आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते.
येणाऱ्या २२ तारखेला दिवाळी साजरी करता यावी म्हणून हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीने घरोघरी दिव्यांचे वाटपही केले जात आहे. शिवाय, प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेले बॅच नागरिकांच्या खिशाला लावत मोठ्या आनंदाने श्रीरामाचा जयघोष केला जात आहे.
अप्पा रेणुसे आणि मित्र परिवार यांनी आज आयोजित केलेल्या ऐश्वर्य कट्टा या उपक्रमात आमदार रवींद्र धंगेकर हे माजी उपमहापौर दिलीप बराटे, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासमवेत सहभागी झाले होते.
त्यानंतर त्यांनी अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांना प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेले बॅच दिले. श्रीराम हे आपल्या सर्वांच्याच श्रध्देचा, आस्थेचा विषय आहेत. त्यामुळे आम्ही भक्तीभावाने हे उपक्रम हाती घेतले आहेत, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.