जिल्हा हरित करण्यासाठी घनदाट वृक्ष लागवड करा – राज्यमंत्री खोतकर

जालना : जिल्ह्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 1 कोटी 5 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची यशस्वीपणे लागवड सर्वांच्या सहकार्यातून निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर त्या वृक्षांचे संगोपनही करणे तितकेच गरजेचे असून संपूर्ण जिल्ह्यात घनदाट वृक्ष लागवड करुन संपूर्ण जिल्हा हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जैवविविधता उद्यान जालना येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मनरेगाच्या माध्यमातूनही यशस्वीरित्या वृक्ष लागवड करता येणे शक्य असुन गोलापांगरी या गावात याच योजनेच्या माध्यमातून एक हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. या माध्यमातुन मजुरांना रोजगार मिळण्याबरोबरच वृक्षांची चांगल्या प्रकारे निगा राखता येणे शक्य असल्याने संपुर्ण जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगत ही वृक्ष लागवड मोहिम केवळ शासकीय उपक्रम न राहता सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समाजातील स्वसंसेवी संस्था, उद्योगपती, नागरिक यांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीना मोफत रोपे वाटपाचा हिरवा झेंडा दाखवुन मंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×