वृक्ष लागवड कार्यक्रम लोकचळवळ व्हावी – बबनराव लोणीकर

जालना : वनक्षेत्राच्या कमतरतेमुळेच मराठवाड्यासह जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. वनक्षेत्र कमी असल्यामुळेच आपणाला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकचळवळ होऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जैवविविधता उद्यान जालना येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले, राज्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम गेल्या चार वर्षापासुन सुरु आहे. गत चार वर्षात संपूर्ण राज्यात 20 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, वनक्षेत्राच्या कमतरतेमुळे मराठवाड्यासह जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. वनक्षेत्र कमी असल्यामुळेच आपणाला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यासह जिल्ह्यात पाऊस पाडण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाधिक वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात दुष्काळी परिस्थितीवर आपण कायमस्वरुपी मात करण्यात यशस्वी ठरु शकतो. यासाठी संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×