पीक विम्यासाठी कृषिमंत्र्यांना भेटणार

जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्र्यांना साकडे
नागवडे यांनी आढळगाव येथील आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट
श्रीगोंदा – पीक विम्याचा हप्ता भरूनही बिगर कर्जदार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी, यासाठी जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आग्रही व आक्रमक भूमिका घेत वंचित शेतकऱ्यांची बाजू मांडली. बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच संबंधित पीकविमा कंपनीकडे पाठपुरावा करून कृषिमंत्र्यांना जिल्हा बॅंकेच्या संचालक शिष्टमंडळासह भेटणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक तथा “नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

डाळिंबाचा पीक विमा हप्ता भरुनही बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने आढळगाव येथील शेतकरी शरद जमदाडे, शिवप्रसाद उबाळे, मनोज ठवाळ, सुधीर जामदार, सुनिल शिंदे, अनिल काळे, संजय वाकडे, जालिंदर बोळगे, अशोक जमदाडे, शंकर शिंदे, सचिन जमदाडे यांनी तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या भावना समजून घेतल्याचे सांगून नागवडे म्हणाले की, आज जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत बिगर कर्जदार डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित करुन या शेतकऱ्यांना न्याय देण्याची आग्रही भूमिका मांडली. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला मग पीक विम्याचा हप्ता भरणारे बिगर कर्जदार शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित का? याची चौकशी करण्याची भूमिका घेतली.

बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रश्‍नावर सकारात्मक भूमिका घेतली असून बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे मान्य केले. संबंधित शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून पीक विमा कंपनीकडे विशेष पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे सांगून नागवडे म्हणाले की, पीक विम्याच्या रकमेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरही बॅंक पाठपुरावा करणार असून बॅंकेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के व आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेचे शिष्टमंडळ राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील व कृषी सचिवांची लवकरच भेट घेणार आहे.शेतकऱ्यांचा प्रश्‍नावर लढण्यात कमी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जळालेल्या डाळिंब, द्राक्ष, लिंबू, केळी व अन्य फळबागांचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत भरीव नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी पालकमंत्री प्रा.राम शिंदे व जिल्हाधिकारी राहुर द्विवेदी यांच्याकडे केली असल्याचे सांगून नागवडे म्हणाले की, राज्य सरकारने त्वरीत पाऊले उचलून जळालेल्या फळबागा व अन्य पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा व मदतीचा हात द्यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेणार आहोत, असे सांगितले. शेतकऱ्यांची प्रश्‍न आगामी काळात मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)