उरमोडीच्या पाण्यासाठी दिवड ग्रामस्थांचे आंदोलन

उरमोडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दिवड ग्रामस्थांनी सातारा-पंढरपूर रस्ता धरला रोखून

म्हसवड  – दुष्काळी परिस्थितीमुळे दिवड ग्रामस्थांची चांगलीच होरपळ सुरू आहे. त्यामुळे उरमोडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दिवड ग्रामस्थांनी सातारा-पंढरपूर रस्ता रोखून धरत सुमारे तासभर आंदोलन केले. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. यावेळी उरमोडी प्रकल्पाचे अभियंता पवार यांनी येत्या दहा जूनपर्यंत उरमोडीचे पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
दुष्काळ हा माण तालुक्‍याच्या पाचवीला पुजलेला आहे. मात्र यावेळचा दुष्काळ 1972 पेक्षा भयानक आहे. विहिरी, तलाव, बंधारे, ओढे, नदी, सहा ते आठ महिन्यांपूर्वीच कोरड्या असून टॅंकरच्या पाण्यावर येथील जनता आपली तहान भागवत आहे.

उरमोडीचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटून जनावरांना या पाण्यामुळे हिरवा चारा मिळणार आहे. त्यासाठी उरमोडीचे पाणी दिवडला सोडण्यासंदर्भात 15 मे रोजी कार्यकारी अभियंता उरमोडी, जिल्हाधिकारी सातारा, प्रांताधिकारी, तहसीलदार माण कृष्णा खोरे सिंचन विभाग व म्हसवड पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन येत्या 27 मे पर्यंत उरमोडीचे पाणी दिवडला न सोडल्यास रस्तारोकोचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे सकाळी आकरा वाजता दिवड येथे सातारा पंढरपूर रोडवर ग्रामस्थांनी तासभर आंदोलन केले. यावेळी उरमोडी प्रक्‍लपाचे अभियंता पवार यांनी आंदोलनास्थळी येऊन येत्या 10 जूनपर्यंत उरमोडीचे पाणी दिवडला सोडण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी बालेखान सय्यद, सयाजी लोंखडे, अण्णासाहेब काटकर, सत्यवान सावंत, नवनाथ लोखंडे, धनाजी सावंत, शफीक सय्यद, रामचंद्र सावंत, तुकाराम सावंत, यशवंत सावंत, तानाजी भोसले, बबन काटकर आदी दिवडचे ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सपोनि मालोजीराव देशमुख यांनी आंदोलकांशी समन्वय साधून वाहतूक तातडीने सुरू व्हावी यासाठी अभियंते पवार यांना बोलवून घेऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here