काबुल – तालिबानने अफगाणिस्तानचा पुन्हा ताबा घेतल्यानंतर तेथील नागरिकांवर जाचक कायदे लादण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील हेमलंद प्रांतामध्ये तालिबान्यांनी एक नवा फतवा काढला असून यावेळी तो महिला नव्हे तर पुरुषांशी संबंधित आहे. तालिबान्यांनी केशकर्तनालये चालवणाऱ्या व्यावसायिकांना, पुरुषांची दाढी कमी करण्यास अथवा पूर्णपणे काढण्यास मनाई केली आहे.
पुरुषांनी दाढी कमी करणे अथवा काढून टाकणे हे इस्लाम धर्माचे उल्लंघन असल्याचं तालिबानी मानतात. या नियमांचे कोणी उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
पुन्हा सत्तेत आल्यानंतर तालिबानी नेत्यांनी, ‘यावेळी तालिबान सरकार अधिक कठोर कायदे न करता सौम्य स्वरूपाचे सरकार चालवेल’ असा दावा केला होता. मात्र अफगाणिस्तानातील मागील काही घटना व तालिबानने लादलेले जाचक कायदे पाहता हे दावे फोल ठरताना दिसतायेत.
हेमलंद प्रांतातील केशकर्तनालयांवर नोटिसा चिटकवण्यात आल्या असून यामध्ये ‘केशकर्तनालयांनी शिरिया कायद्याचे पालन करूनच दाढी व केस कर्टन करावे’ अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच, ‘याबाबत तक्रार करण्याचा अधिकार कोणालाही नाही’ असे देखील नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
काबुल येथील केशकर्तनालये चालवणारे व्यावसायिक देखील आपल्याला अशाच सूचना दिल्या जात असल्याचं सांगतात. ‘तालिबानचे सैनिक वारंवार येऊन दाढी कमी अथवा काढून न टाकण्याच्या सूचना देतात. आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन होतंय का हे तपासण्यासाठी आम्ही गुप्तचरांना पाठवू’ असं काबुल येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.