नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून तिरुपती मंदिर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा तिरुपती मंदिर चर्चेत आले आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला चांगलेच महागात पडले आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
ग्राहक न्यायालयाने तामिळनाडू येथील तिरुमला तिरुपती देवस्थानाला भक्ताला 14 वर्षे वाट पाहण्यासाठी 50 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. एका भक्ताने तिरुपती देवस्थानाविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता. असा खटला दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भक्त के.आर.हरी भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी 14 वर्षांआधी म्हणजे 2006 साली बुकींग केली होती. करोनाकाळात तिरुपती मंदिर 80 दिवसांसाठी बंद होते. त्यामुळे मंदिरातील वस्त्रालंकारासह सर्व सेवा बंद होत्या. त्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानाने भक्त हरी भास्कर यांना अधिकृत निवेदन पाठवत विचारणा केली होती की त्यांना VIP ब्रेक दर्शनासाठी नवीन स्लॉट हवा आहे की परतावा. यावर भास्कर यांनी देवस्थानाला वस्त्रलंकार सेवेसाठी कोणत्याही तारखेची बुक देण्यास सांगितले होते.
मात्र त्यानंतर देवस्थानाने वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देता येणार नसल्याचे सांगत त्यांना परतावा घेण्यास सांगितला. यानंतर भक्त के.आर.हरी भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायलयाने भक्ताच्या बाजूने निकाल देत तिरुपती देवस्थानाला भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने तिरुपती देवस्थानाला 2006 भास्कर यांनी भरलेल्या बुकींग रक्कम वार्षिक 24 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर यांनी 12,250 रुपये बुकिंग रक्कम भरली होती. नवीन तारीख द्या अन्यथा बुकींग रकमेच्या व्याजासह 50 लाख नुकसानभरपाई द्या, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. तिरुपती देवस्थानाच्या सेवेतील कमतरतेच्या विरोधात एखाद्या भाविकाने ग्राहक न्यायालयात खटला दाखल केल्याची ही पहिलीच घटना आहे.