“तिकोना’वरील फलक समाजकंटकांकडून “लक्ष्य’!

गडप्रेमींची पोलिसांकडे धाव : दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पवनानगर  – मावळ तालुक्‍यातील तिकोना ऊर्फ वितंडगड या किल्ल्यावर आदर्श दुर्गसंवर्धन करणाऱ्या गडभटकंती, वडगाव मावळ व शिवदुर्ग, पुणे या दोन्ही संस्थानी लाखो रुपये खर्चून पायऱ्या बांधल्या व लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या लोकार्पण सोहळ्यास बजरंग दल, मावळ या राष्ट्रभक्‍त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने टिकाऊ किल्ल्याचा इतिहास समजावा म्हणून लोकार्पण सोहळ्यात हा इतिहास फलक भेट दिला होता. काही समाजकंटकांनी या फलकाची तोडफोड केली आहे.

पवनानगर पोलीस स्थानकात तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्थानकात हे कृत्य करणाऱ्याना शोधून त्यावर कठोर कारवाई करावी, असे निवेदन विश्‍वहिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री संदेश भेगडे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे, बजरंग दल प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख सुभाष भोते यांनी दिले. माहितीफलकाची तोडफोड करणाऱ्यांवर योग्य कार्यवाही झाली नाही, तर त्याविरुद्ध आंदोलन उभारण्यात येणार आहे. गडप्रेमींनी गडावर लावलेल्या या फलकामध्ये किल्ल्याचा प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन काळाचा इतिहास अंतर्भूत केला होता. तसेच किल्ल्याचा नकाशा व त्यावरील महत्त्वाची ठिकाणे लिखित होती. परकीय राष्ट्रातील व भारतीय पर्यटक सर्वांना या फलकातील माहितीमधून इत्थंभूत इतिहास निदर्शनास येत होता.

दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धनी स्वखर्चाने किल्ल्यावर दुर्गसंवर्धनासाठी कार्य करीत असतात. मात्र अशा घटना होणे निंदनीय आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन यातील दोषींवर योग्य ती कारवाई करावी. आजमितीस गणेशोत्सवातील सजावट असेल किंवा शिवजयंती उत्सवातील व्याख्यानांच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन हा विषय गावागावात पोहोचत असतानाचे किल्ल्याच्या माहिती फलकाची नासधूस करणे म्हणजे विकृतीच म्हणावी लागेल, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सदानंद पिलाणे यांनी दै. “प्रभात’ बोलताना स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.