पीएमपी मेट्रोच्या खड्ड्यात पडता पडता वाचली

बसचे ब्रेक फेल : 15 प्रवाशांचे वाचले प्राण

बावधन – मेट्रोच्या चाललेल्या कामामुळे वाहतुकीसाठी अतिशय गजबजलेला रस्ता म्हणजे पौड रस्ता. याच गर्दीच्या रस्त्यावर गुरुवारी (दि. 16) पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. परंतु, त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू होते. त्याच मेट्रोच्या खड्ड्याच्या एका बाजूला लागून बस अलगद तरंगत राहिली. त्यामुळे बस पत्राच्या सुरक्षित भिंतीमुळे जागेवरच थांबली अन्‌ बस मधील 15 प्रवाशांचे प्राण वाचले.

पौड रस्ता कायमच गजबजलेला असतो त्यात या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने जो-तो जीव मुठीत घेऊन रस्ता पार करीत असतो. दरम्यान, मेट्रोच्या कामासाठी साधारण 15 ते 20 फुटी मोठमोठे खड्डे घेतले असून त्या खड्ड्याच्या बाजूने सुरक्षित पत्र्यांची भिंत बांधण्यात आली आहे. अशातच मंगळवारी (दि. 16) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पौड रस्त्याने वाट काढत निघालेली पीएमची बस क्रमांक 94 कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन ही शास्त्रीनगरच्या कोथरूड पोलीस ठाण्याच्या समोर आली असता बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यावेळी बसमध्ये साधारण 15च्या आसपास प्रवासी होते. बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठा अपघात होऊ नये म्हणून बस एका बाजूला घेतली. त्यावेळी संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याला धडकली व चालकाकडील चाक त्या मेट्रोच्या खड्ड्यात अलगद तरंगत थांबल्याने प्रवाशांची सुटकेचा निश्‍वास सोडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.