तिहारची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले आहे. त्यामुळे “आमच्याकडे भ्रष्टाचाराची कागदपत्रे आहेत, तिहार मध्ये माणूस आहे’ अशी भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. ही भाषा केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरली जाते’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, श्रीकांत शिरोळे आदी उपस्थित होते.

“एखाद्याने भ्रष्टाचार केला आहे हे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे, किंवा त्यांच्या निदर्शनाला आले आहे तर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी. परंतु तसे करण्याऐवजी ब्लॅकमेलिंग आणि राजकीय फायद्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे, चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये कोणकोणत्या मुद्‌द्‌यांचा समावेश केला आहे, याची माहिती चव्हाण यांनी दिली. तसेच सरकारच्या घरोघरी शौचालय आणि उज्ज्वला योजनेवरही चव्हाण यांनी टीका केली. भाजपला तर “जाहीरनामा’ असा शब्दही वापरला नाही त्याला त्यांनी संकल्पपूर्ती असे म्हटले आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले. दरम्यान, ” राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षांतराबद्दल माहिती नाही’ असाही दावा चव्हाण यांनी केला.

राज ठाकरेंचे चव्हाणांकडून कौतुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोदी सरकारचा पर्दाफाश करत आहेत. ते प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवार देऊन सहभागी होणार नसले तरी ते या प्रक्रियेचा एक भाग आहेत, असे बोलून पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंचे कौतुक केले. तो त्यांचा मुलभूत अधिकार आहे. कोणाला मतदान करावे याविषयी ते बोलत असतील, तर तो त्याच प्रक्रियेचा भाग असल्याचे चव्हाण म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.