कुदळवाडीत उसळला आगडोंब

सात भंगार गोदामांना आग
सात तासांच्या परिश्रमानंतर आग विझविण्यात यश

उन्हाळ्यात आगीच्या घटनांत वाढ
चालू वर्षात अर्थात 2019च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये ही तीसरी आगीची घटना असून चिखली-कुदळवाडी परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढते. या परिसरात पूर्णपणे भंगारचे सामान असून कागदी पुठ्ठे, रद्दी,असा कचरा भंगार व्यावसायिक जाळतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात लवकरत आग भडकते. तसेच सर्व गोदामे ही पत्रा शेडची असल्यामुळे त्यांचे तापमान तापते व त्यातूनही आग लागण्याची शक्‍यता असते. 2018या सालात कुदळवाडी परिसरात तब्बल 69 आगीच्या घटना घडल्या होत्या. 2016 साली तर एकाच वेळी 25 भंगारची गोदामे जळून खाक झाली होती. यावरुनही महापालिका प्रशासन बोध घेण्यास तयार नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून चिखली-कुदळवाडी आगीचे सत्र सुरुच आहे.

पिंपरी –चिखलीतील कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आगीचे डोंब उसळले. दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरात असलेल्या भंगार गोदामांना आग लागते. एक महिन्याच्या आत दुसऱ्यांदा पुन्हा या परिसरात आग लागली असून या आगीत भंगार मालाची सात गोदामे जळून खाक झाली आहेत. सोमवारी (दि.8) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका गोदामास आग लागली आणि थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात ही आग पसरली.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चिखलीतील कुदळवाडी परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी पिंपरी, भोसरी, चिखली, निगडी प्राधिकारण अशा शहरातील अकराही केंद्राच्या गाड्या व टाटा मोटर्स, चाकण, सेंच्युरी इन्का, फोर्स मोटार या खासगी कंपन्यांचे बंबही बोलवले.

आग इतकी भीषण होती की, सर्व गाड्यांना किमान दोनवेळा तरी पाणी आणून आग विझवावी लागली. आगीवर नियत्रंण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे सात तास परिश्रम घेतले. पहाटे पाचच्या सुमारास लागलेली आग दुपारी साडेबाराच्या सुमारास आटोक्‍यात आली. या आगीत गोदामांमध्ये साठवून ठेवलेला भंगार माल जळून खाक झाला आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र येथे साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लावलेल्या आगीतून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. आगीत एकूण किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.