पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली अहे. शहरात ९३० अधिकारी आणि तब्बल साडेदहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी शहरातील दहा मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निश्चित केले आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुका कालावधीत शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या काळात प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित येणार आहेत. जाहीर सभा, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्ताची आखणी पोलिसांनी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालय अखत्यारीत पुणे लोकसभा मतदारसंघासह, शिरुर, बारामती लोकसभा मतदार संघांचा काही भाग येतो.
बारामती मतदार संघाचे मतदान ७ मे रोजी हाणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. हा भाग पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. मतदानाच्या दिवशी तेथे ३७० पोलीस अधिकारी, साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे ४७५ जवान, निमलष्करी दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या असा बंदोबस्त असेल.
दि. १३ मे रोजी पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदान होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १३ मे रोजी तेथे ५६० पोलीस अधिकारी, सात हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षकदलाचे १९०० जवान, निमलष्करी दलाच्या तीन तुकड्या, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात असतील.