बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो टायरग श्रॉफ धमाका करण्याच्या तयारीत आहे. तो “गणपत’ हा स्पोर्टस ड्रामा चित्रपट करत असून यात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट दोन भागात चित्रित करण्यात येणार असून टायगरने चित्रपटासाठीची तयारी देखील सुरू केली आहे. विशेष म्हणजे, टायगर हा पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकताच टायगरने लगेच होकार दर्शविला. लॉकडाऊनच्या काळातच टायगरने आपल्या फिजिकलवर काम सुरू केले आहे. टायगर एका बॉक्सरसारखी आपली शरीरयष्टी तयार करत आहे. तसेच चित्रपटात बॉक्सिंगच्या मॅचेस् दाखविण्यात येणार असल्याने तो बॉक्सिंगचेही प्रशिक्षण घेणार आहे. विशेष म्हणजे, यात टायगरचे वडील जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे “गणपत’ असे नाव यासाठी ठेवण्यात आले आहे की, बॉक्सर असलेला टायगर हा चित्रपटात गणपतीचा भक्त असल्याचे दाखविण्यात येणार आहे.
View this post on Instagram
तसेच हा चित्रपट मुंबई बेस्ड असून मुंबईत गणेशोत्सव किती जल्लोषात साजरा केला जातो हे जगजाहीर आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास टायगरने “बागी-3’ने या वर्षाची दमदार सुरुवात केली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच लॉकडाउन जाहीर झाल्याने चित्रपटगृह बंद करण्यात आली. यामुळे “बागी-3′ चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.