सत्ताधारी अनभिज्ञ – प्रशासनात नाही ताळमेळ
पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामधील डेड हाऊस गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एवढ्या दिवसांपासून डेड हाऊस बंद आहे मात्र याबाबत प्रशासनाने सत्ताधारी पक्षाला खबरही लागू दिली नाही. एकीकडे रुग्णालयातील कर्मचारी शवगृह बंद असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयाचे अधिष्ठाता डेड हाऊस सुरू असल्याचे ठासून सांगत आहेत.
शहरामध्ये करोनाने उच्छाद मांडला आहे. दररोज सुमारे 20 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा, अपघात झालेल्यांचाही मृत्यू होत आहे. दूरच्या नातेवाइकांना मृतदेह लगेच नेणे शक्य होत नाही. तसेच नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे मृतदेह शवागृहात ठेवण्याची वेळ येते.
मात्र त्याठिकाणी शवागृहातील कॉम्प्रेसर बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून शवागृह बंद आहे. तिथे मृतदेह ठेवण्यासाठी नकार दिला जातो. प्रशासनाने देखावा म्हणून त्याठिकाणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत. मात्र त्यामध्येही मृतदेह ठेवला जात नाही. त्यामुळे नातेवाईकांना निम्म्या रात्री अंत्यविधी करण्यासाठी न्यावे लागते किंवा मृतदेह तसाच ठेवावा लागतो. मात्र याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
वायसीएम रुग्णालयातील डेडहाऊस बंद असल्याची सत्ताधारी पक्षाला साधी माहितीही नव्हती. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी याबाबत निवदेन दिल्यावर सत्ताधारी खडबडून जागे झाले. त्यानंतर पक्षनेते नामदेव ढाके यांना फोन करण्यास सुरुवात केली.
पक्षनेत्यांचा नाही धाक
वायसीएम रुग्णालयातील डेडहाऊस बंद असल्याची माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांना दिल्यानंतर ते खडबडून जागे झाले. त्यांनी वायसीएम प्रशासनाशी संपर्क केला. त्यांना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांनी डेडहाऊस सुरू असल्याचे ठासून सांगितले. तर थेट डेडहाऊसमध्ये संपर्क केला असता कर्मचाऱ्यांनी ते बंद असल्याचे सांगितले. यावरून पक्षनेत्याला अधिकारी अंधारात ठेवत असून खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पक्षनेत्यांनी आयुक्तांना फोन केला. तेव्हा आयुक्तांनी डेडहाऊस बंद असून त्यामध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी निविदा काढली असल्याचे सांगितले.