शिरगाव – गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमवर तिकीट विक्री केंद्र सुरु करावे अशी मागणी गहुंजे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पूर्वी ऑफलाईन तिकीट विक्री केंद्राची व्यवस्था होती. त्यामुळे, गहुंजेसह परिसरातील क्रीडा प्रेमी नागरिकांना तिकीट विकत घेऊन तेथील सामने पाहता येत होते. परंतु, यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या काळात येथील पूर्वीचे तिकीट विक्री केंद्र बंद करुन लिलाव व ऑनलाइन पद्धतीने तिकीट विक्री केली जात आहे. या तिकिटाचा उपयोग शहरवासीयांनाच होत असून स्थानिक ग्रामस्थ त्यापासून वंचित राहिले आहेत. पैसे देण्याची तयारी असतानाही तिकीट मिळत नसल्याने गहुंजेकरांची नाराजी वाढली आहे.
या स्टेडियमवर आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 8 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड तर 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश असे आणखी दोन सामने होणार आहे.
प्रत्येक वेळी सामना असताना दिवसभर होणाऱ्या गर्दीमुळे रस्ते बंद करण्याचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे, स्थानिक नागरिकांना काम सोडून दिवसभर घरात कोंडून बसण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी होण्याच्यादृष्टिने देखील उपाय योजना केल्या जाव्यात, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.