Girish Mahajan on Sanjay Raut | Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहे. या लेखात भाजप पक्षातील अंतर्गत वादाबाबत सांगण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले, असा गंभीर दावा केला आहे.
यावरून राजकारण तापले आहे. त्यांनी या लेखात उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे. अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सामनामध्ये 4 जूननंतरची मोक्षप्राप्ती! या शीर्षकाखाली हा गंभीर दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, आता संजय राऊतांच्या या दाव्यांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘संजय राऊत यांचं डोकं तपासावं लागेल. आता तेवढेच राहिलं आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल’, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभेच्या निकालावर गिरीश महाजन म्हणाले…
येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले की, ‘घोडामैदान समोर आहे. काय आहे ते समोर येईल. जळगाव लोकसभेच्या जागेबाबत बातम्या, निराधार गोष्टी सध्या पसरत आहेत. त्यामुळे आपण चार तारखेला भेटू.
जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात जास्त उच्चांकी विक्रमी मत राहतील. लिहून घ्या उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.
राज्यामध्ये सर्वात जास्त निकाल हा महायुतीच्या जागेबाबत महाराष्ट्रातून जाईल. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. स्पष्ट बहुमत आमचं देशामध्ये येईल. मोठ्या मतांनी आमचे खासदार देशात निवडून येतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील.
पूर्ण देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवला आहे. त्यानुसार तेच पंतप्रधान होतील, असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे.