Archery World Cup Stage 2 : येचिओन(दक्षिणव आफ्रिका) येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक स्टेज -2 कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्णपदक आणि मिश्र सांघिक रौप्य पदक जिंकले आहे. शनिवारी झालेल्या महिलांच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने तुर्कीचा पराभव केला, तर मिश्र संघाला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, प्रनीत कौर आणि अदिती स्वामी या भारतीय त्रिकुटाने तुर्कीच्या हजल बुरुन, आयसे बेरा सुझार आणि बेगम या त्रिकुटाचा 232-226 असा पराभव केला.
विश्वकरंडकात भारतीय त्रिकुटाचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी या त्रिकुटाने या वर्षाच्या सुरुवातीला शांघाय येथे झालेल्या विश्वकरंडक स्टेज-1 मध्ये इटलीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले होते. याआधी त्यांनी गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्टेज-4 मध्येही सुवर्णपदक जिंकले होते. याआधी उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने अमेरिकेचा २३३-२२९ असा पराभव केला होता.
मिश्र प्रकारातही रौप्य कामगिरी…
मिश्र सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळाले. ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रियांश या जोडीला कंपाउंड मिश्रच्या अंतिम फेरीत ऑलिव्हिया डीन आणि सॉयर सुलिव्हन या अमेरिकन जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्यपदाकावर समाधान मानावे लागले. तर युवा कंपाऊंड तिरंदाज प्रथमेश फुगे यालाही वैयक्तिक गटात उपांत्य फेरी गाठून पदकाची आशा आहे.