लखनौ – ईशान किशन, रोहित शर्मा व टीम डेव्हीड यांनी निकराचे प्रयत्न केल्यानंतरही मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून अवघ्या 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयाच्या जोरावर लखनौच्या प्लेऑफच्या आशा कायम राहिल्या असून मुंबईचे मात्र, पात्र होण्याचे दडपण वाढले आहे. यश ठाकूर व मोहसीन खान यांनी मोक्याच्या क्षणी घेतलेले बळी व केलेली अत्यंत अचूक गोलंदाजी लखनौच्या विजयात मोलाची ठरली.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली झाली. सातत्याने अपयशी ठरत असलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात मात्र, आत्मविश्वासाने खेळला. त्याने ईशान किशनसह 90 धावांची सलामी दिली. यावेळी रोहित आक्रमक खेळ करत होता. मात्र, याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने आपल्या 25 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार 3 षटकारांसह 37 धावा केल्या. ईशानने आपले अर्धशतक थाटात साकार केले. त्याने सूर्यकुमारच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले.
ईशानने आततायी फटका मारून परतला. त्याने आपल्या खेळीत 39 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 59 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने यश ठाकूरच्या गोलंदाजीवर स्कूपचा फटका खेळताना आत्मघातकी फलंदाजी केली व 7 धावांवर बाद झाला. निहाल वधेराने अनावश्यक फटका मारून आपली विकेट बहाल केली. त्याने 20 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा केल्या. पाठोपाठ विष्णू विनोदनेही निराशा केली. यावेळी मुंबईला 12 चेंडूत 30 धावांची गरज होती. खेळपट्टीवर टीम डेव्हीड होता मात्र, यश ठाकूर व मोहसीन खान यांनी कमालीची भेदक गोलंदाजी करत लखनौचा विजय साकार केला. टीम डेव्हीड 19 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार फटकावत 32 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, मार्कस स्टोनिसची वादळी फलंदाजी व कर्णधार कृणाल पंड्या याची उपयुक्त खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 बाद 177 धावा अशी समाधानकारक मजल मारली. स्टोनिसने षटकारांची बरसात करत वर्चस्व गाजवले.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा लखनौला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर दीपक हुडा धावफलकावर 12 धावा असताना बाद झाला. पाठोपाठ जेसन बेहरेनड्रॉफने त्यानंतरच्या चेंडूवर प्रेरक मंकडलाही तंबूचा रस्ता दाखवला. पियुष चावलाने स्थिरावलेल्या क्वांटन डीकॉकला बाद केले व लखनौची स्थिती 3 बाद 35 अशी बिकट केली होती. डीकॉकने 2 षटकारांसह 15 चेंडूत 16 धावा केल्या. मात्र, कर्णधार कृणाल पंड्याने मार्कस स्टोनिसला साथीला घेत संघाला अर्धशतकी तर त्यानंतर शतकी मजल मारून दिली.
या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीवर आक्रमण करत धावांचा वेगही वाढवला. कृणाल दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर गेला. यावेळी तो 42 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 49 धावांवर नाबाद होता व या जोडीने चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर स्टोनिसने निकोलस पूरनच्या साथीत पाचव्या गड्यासाठी अवघ्या 24 चेंडूत 60 धावांची नाबाद भागीदारी केली. स्टोनिसने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. त्याने नाबाद 89 धावांची खेळी करताना 48 चेंडूत 4 चौकार व 8 षटकारांची आतषबाजी केली. पूरन 8 धावांवर नाबाद राहिला.
लक्षवेधी
पंड्याचे अर्धशतक दुखापतीमुळे हुकले
स्टोनिस व पूरनच्या भागीदारीने वर्चस्व
मुंबईकडून महत्त्वाच्या षटकांत ढिसाळ क्षेत्ररक्षण
स्टोनिसला मिळालेली तीन जीवदाने महागात
चांगल्या सुरुवातीनंतर रोहितकडून निराशा
ईशानचे अर्धशतक
रोहित व ईशानच्या भक्कम सलामीनंतर डाव घसरला
डेव्हीडचे प्रयत्न अपुरे
लखनौ व मुंबईला पुढील सामना जिंकणे अत्यावश्यक
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स – 20 षटकांत 3 बाद 177 धावा. (कृणाल पंड्या जखमी निवृत्त 49, मार्कस स्टोनिस नाबाद 82, निकोलस पूरन नाबाद 8, जेसन बेहरेनड्रॉफ 2-30, पियुष चावला 1-26). मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 5 बाद 172 धावा. (निहाल वधेरा 16, रोहित शर्मा 37, ईशान किशन 59, टीम डेव्हीड नाबाद 32, रवी बिष्णोई 2-26, यश ठाकूर 2-40, मोहसीन खान 1-26).