राजेंद्र वाघमारे
नेवासा – एकीकडे महसूल प्रशासन नवीन वाळू धोरणाच्या आधारावर वाळू डेपो सुरू करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे या वाळू डेपोला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असून, याबाबत ग्रामस्थ आता आंदोलन करण्याच्या तयारीत उतरले असून, यासाठी उच्च न्यायालयात ग्रामस्थांनी धावही घेतली आहे. तिसरीकडे प्रवरा नदीपात्रातून चोरून वाळूउपसा सुरूच असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्यात पकडलेल्या वाळू वाहनांवर झालेल्या कारवाईतून समोर येत आहे.
महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्वसामान्यांना बांधकामासाठी वाळू अगदी स्वस्तात मिळावी व वाळूच्या जीवावर चालणारी दादागिरी संपुष्टात आणून वाळूतस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, तालुक्यातील अंमळनेर, करजगाव, निंभारी व परिसरातील गावकऱ्यांनी सरकारच्या नवीन वाळू डेपोला तीव्र विरोध केला आहे. मुळा पट्ट्यात वाळू उचलेगिरी कधीही होऊ न दिल्यामुळे परिसरातील शेती व्यवसाय टामटुमीत सुरू आहे.
या भागातून यापूर्वी कधीच ग्रामस्थांनी वाळू उचलू दिलेली नाही. त्यामुळे या नदीपात्रात मोठी वाळू शिल्लक असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे सरकारच्या नवीन वाळू डेपोला येथून सुरुवात करण्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असतानाच सरकारच्या वाळू डेपो सुरू करण्याला येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे.
सरकारचे नवीन वाळू धोरण असेल, तर संपूर्ण गावाचा प्रपंच या नदीपात्रातील पाण्यावर चालत असून, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पांढरे सोने (वाळू) असून, या सोन्याला हात लावला तर याद राखा…? प्रसंगी अंगावर गोळ्या झेलू मात्र वाळूचा एक खडादेखील उचलू देणार नाही? अशी खमकी भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली आहे. दुसरीकडे नदीपात्रातून वाळूतस्करांनी दिवसाढवळ्या वाळू उचलेगिरी करून नदीला मोठे खिंडार व बोगदे पाडलेले आहेत.
नदीमध्ये खड्डेच खड्डे करून अनधिकृत वाळू उचलली गेली आहे. या आडमाप झालेल्या उत्खननावर महसूल विभागाने कुठलीही कारवाई न करता तहसीलदार बंगल्यासमोर व पोलीस ठाण्यात लावलेले वाळूतस्करांचे वाहनेही अलगद गुन्हे दाखल असताना पुन्हा बाहेर गेलेले आहेत.
त्यामुळे कुंपणच शेत खाण्याचा प्रकार सुरू असून, सरकारचे नवीन वाळू धोरण उपक्रम स्तुुत्य असला, तरी टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांमुळे नवीन वाळू डेपो कार्यपद्धती कशी असणार आणि अधिकारी कशी चालवणार, यावरच हे गणित अवलंबून असणार आहे. तालुक्यात नवीन वाळू डेपोला विरोध झाला असून, आता नव्या वाळूडेपोविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत
सर्व काही आलबेल!
वाळूतस्कर वाळू वाहतुकीतून दादांना सलामी देत आहे, तर भाऊसाहेबांना ऑफिसात फिर मिलेंगे असे तस्कर सांकेतांक देत असून, हाताला हात देऊन सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत आहे.