पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन आहेत. ती बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी प्रामुख्याने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध कर्मचारी कपात न करता लागू करणे, नायब तहसीलदार सरळ भरतीचे प्रमाण निश्चित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयक आणि वेतन वेळेत मिळणे, महसूल सहाय्यक व तलाठी यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करणे.
अव्वल कारकून आणि तलाठी पदासाठी समान परीक्षा पद्धती लागू करणे, पदोन्नती संदर्भातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच महसूल विभागातील अव्वल कारकून यांचे पदनाम महसूल अधिकारी करणे अशा विविध मागण्या बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिशकालीन आहेत. या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याची मागणी महसूल कर्मचारी संघटनांनी केली होती. या मागणीला विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.