पिंपरी: ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात एकजण अडकला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन अग्निशामक जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने गाडले गेले. ही घटना दापोडी येथे रविवारी सायंकाळी घडली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेज लाइनसाठी एक खड्डा खोदला आहे. या वीस फूट खोल खड्ड्यात एक नागरिक पडला असल्याची माहिती रविवारी सायंकाळी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
खड्ड्यात पडलेल्या माणसाला वर काढत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामध्ये खड्ड्यात पडलेल्या माणसासह अग्निशामक दलाचे दोन जवान गाडले गेले आहेत. या जवानांच्या बचावासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच एनडीआरएफचे एक पथक लवकरच घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती अग्निशामक दलांनी दिली.