#AUSvPAK 2nd Test : पाकची दुस-या डावातही खराब कामगिरी सुरूच

ऑडलेड : पाकिस्तान विरूध्दच्या दुस-या कसोटी सामन्यात दुस-या दिवशी ऑस्ट्रोलीयाने ३ बाद ५८९ धावांपर्यत मजल मारली आणि पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीच्यासमोर पाकचा पहिला डाव ३०२ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलीयाला २८७ धावांची मजबूत आघाडी मिळाली. त्यानंतर दुस-या डावातही पाकची खराब कामगिरी सुरूच राहिली आणि तिस-या दिवसअखेर पाकची १६.५ षटकांत ३ बाद ३९ अशी बिकट अवस्था झाली आहे.

दुस-या डावातही ऑस्ट्रेलीयन गोलंदाजीसमोर पाक फलंदाजाची दाणादाण उडताना दिसली. जोश हेजलवूडने ‘इमाम-उल-हक’ ला एल बी डब्ल्यू बाद करत पाकला पहिला झटका दिला. इमाम-उल-हक शून्यावर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजहर अलीसुध्दा फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. अजहर अली ९ धावांवर असताना स्टार्कने त्याला स्टिव स्मिथकरवी झेलबाद करत दुसरा झटका दिला. पहिल्या डावात ९७ धावा करणारा आझम दुस-या डावात फेल गेला. जोश हेझलवूडने टीम पेनकरवी बाबर आझमला ८ धावांवर बाद करत माघारी धाडले. दुस-या डावात ऑस्ट्रेलीयाकडून जोश हेझलवूड २ तर मिशेल स्टार्कने १ गडी बाद केला.

तिस-या दिवसअखेर पाकची ३ बाद ३९ अशी बिकट अवस्था झाली असून पाक संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अजूनही २४८ धावांची आवश्यकता आहे. पावसामुळं खेळ लवकर थांबवावा लागला, तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर शान मसूद १४ तर असद शफीफ ०८ धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी, कालच्या ६ बाद ९६ वरून पुढे खेळताना पाकने आज तिस-या दिवशी सावधरितीने खेळ केला. बाबर आझम आणि यासिर शाहने सातव्या विकेटसाठी ९८ धावांची भागिदारी रचली. आझम ९७ धावांवर असताना स्टार्कने टीम पेनकरवी त्याला झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेला शाहीन अफरीदी शून्यावर बाद होत माघारी परतला. त्यानंतर यासिरने मोहम्मद अब्बासच्या साथीनं डाव सावरत नवव्या विकेटसाठी ८७ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या २८१ पर्यत नेली. मोहम्मद अब्बास २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर यासिरने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यासिर शाह ११३ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला लायनकरवी झेलबाद करत पाकचा पहिला डाव ३०२ वर संपुष्टात आणला.

ऑस्ट्रेलीयाकडून गोलंदाजीत पहिल्या डावात मिशेल स्टार्कने ६६ धावा देत सर्वाधिक ६ गडी बाद केले. कमिन्सने त्याला उत्तम साथ देत ३ तर हेझलवूडने १ गडी बाद केला.

धावफलक :

ऑस्ट्रेलीया : पहिला डाव : ३ बाद ५८९ घोषित.                                                                        पाकिस्तान : पहिला डाव : सर्वबाद ३०२( यासिर शाह ११३, बाबर आझम ९७, मिशेल स्टार्क ६६/६, कमिन्स ८३/३). पाकिस्तान : दुसरा डाव : ३ बाद ३९( इमाम उल हक ०, अजहर अली ९, बाबर आझम ८, शान मसूद नाबाद १४ आणि असद शफीफ नाबाद ०८ खेळत आहे, हेझलवूड १५/२, मिशेल स्टार्क १०/१)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.