पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या सोळा दिवसांपासून सातत्याने “करोना’चे रुग्ण वाढत असल्याने सध्या शहरात चिंतेचे वातावरण आहे. त्यात गेल्या 14 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांनी “करोना’वर मात केल्याची दिलासादायक बातमी आली आहे. या तीन रुग्णांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील आणखी दोन रुग्णांना “करोना’ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफच्या मदतीने “करोना’शी लढत देत असलेले तीन रुग्ण ठणठणीत बरे होऊन शनिवारी घरी परतले, यामुळे आनंदाचे वातावरण होते. तर शनिवारी सायंकाळपर्यंत आणखी दोन रुग्णांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी बाधा झालेले रुग्णांमध्ये एक 65 वर्षांची स्त्री आहे तर एक 52 वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण मोशी व दिघी परिसरातील आहेत. या दोघांनाही शुक्रवारी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल शनिवारी सकाळी आले असून त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण रुग्णांची संख्या 84 झाली आहे. तर उपचाराधीन रुग्ण 60 आहेत, त्यापैकी तीन रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत आहेत. तसेच शहरातील रहिवासी असून शहराबाहेर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9 इतकी आहे. यामुळे शहरात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी आहे.
शहरात 8 एप्रिलपासून रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. या सतरा दिवसांत तब्बल 62 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरवासियांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. 8 एप्रिलला शहरात एक कोरनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर 9 ताऱखेला तीन व 10 तारखेला चार नवीन रुग्णांची भर पडली होती. 11 एप्रिल रोजी दोन, 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिलला दोन व 14 एप्रिल रोजी तब्बत सहा नवीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर 15 व 16 एप्रिल रोजी प्रत्येकी चार रुग्ण सापडले होते. 17 एप्रिल रोजी दोन व 18 एप्रिललाही सात रुग्ण सापडले होते.
त्यानंतर तीन दिवस म्हणजेच 21 तारखेपर्यत प्रत्येक दिवशी एक रुग्ण सापडला.
22 व 23 एप्रिल रोजी प्रत्येकी तीन-तीन रुग्ण सापडले. तर 24 एप्रिलला सकाळी एकाच परिसरातील तब्बल बारा रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. व आज शनिवारी दोघाजणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा 84 वर गेला आहे.