पुणे – शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे पूत्र आणि युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी दिला.
अश्विनी सोपान कांबळे (वय 25, रा. 998 बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57, रा. 891 बुधवार पेठ), निरंजन सागर म्हंकाळे (वय 19, रा. 949 बुधवार पेठ, गवळी वाडा) अशी त्या तिघांची नावे आहेत. गुन्ह्यातील फरार साथीदार आणि निरंजन हे गुन्हा घडण्यापुर्वी गंज पेठ परिसरात भेटल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे.
पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील सुरेखा क्षिरसागर यांनी न्यायालयाला दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळी समोरील रस्त्यावर घडली. जुन्या राजकीय वादाच्या कारणावरून राग मनात धरून अटक आरोपी व त्याच्या साथीदारांनी दिपक मारटकर यांची धारदार हत्याराने वार करत गंभीर जखमी करून खून केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार, अटक आरोपींसह सनी कोलते, संदीप ऊर्फ मुंगळ्या कोलते (रा. सुखसागरनगर), रोहित ऊर्फ बाळा कांबळे, राहुल ऊर्फ पांड्या रागीर (रा. लोहिय्यानगर), लखन ऊर्फ आण्णा धावर (रा. पंढरपुर), रोहित क्षिरसागर (रा. गंज पेठ) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भगवान आलमखाने (वय 43, रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.