मायणी – देवदर्शनाला जाताना धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी हद्दीत पहाटे ५:३० वाजता ओमनी कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर चौघेजण गंभीर जमखी झाले आहेत.
सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविकांना लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी घेऊन जात असताना पहाटे कातरखटाव ते मायणी रस्त्यावर धोंडेवाडी येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळून हा अपघात झाला.
या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले. तर चौघेजण गंभीर जखमी आहेत. अपघाताचे वृत्त समजताच वडूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवून दिले. अपघातात ठार व जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हे सर्व जण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.