नव्या इमारतीची मागणी
पारगाव शिंगवे –आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील गावठाणातील जिल्हा परिषद 20 वर्षांपूर्वीच्या जुन्या शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे अशा धोकादायक इमारतीमध्ये शाळेतील मुलांना जीवमुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी पालकांनी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
पारगावच्या गावठाण येथे 20 वर्षांपूर्वी ही दोन वर्ग खोल्यांची सिमेंट पत्र्याची इमारत बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे खराब झालेले सिमेंट पत्रे काढून इमारतीची डागडुजी करून त्या ठिकाणी नविन लोखंडी पत्रे बसवण्यात आले; परंतु भितींवरच्या लोखंडी पत्र्यांवर (वरोडी) बांधकाम केले नसल्याने पावसाचे पाणी भिंतीमध्ये जाऊन या भिंतींना मोठे मोठ्या चिरा गेल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे.
या ठिकाणी इयत्ता तिसरीचे दोन वर्ग असून यामध्ये 60 मुले शिक्षण घेत आहेत. ही इमारत जुनी झाली असून यामधून पावसाळ्यात पाणी गळत आहे. तसेच खिडक्यांना मोठ्या चिरा गेल्या आहेत. ही इमारत धोकादायक बनली आहे, असे मुलाचे पालक शंकर देवडे
यांनी सांगितले.
पावसाळ्यात इमारतीला गळती लागलेली असते भिंतींना तडे गेलेले आहेत. यामुळे मुलांना शेजारील इमारतीमध्ये शिक्षणासाठी बसवण्यात येणार आहे. या जुन्या इमारतीच्या समस्या विषयी पंचायत समितीला कळवण्यात आलेले आहे. तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम सबंधीचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.
-संतोष लबडे, मुख्याध्यापक
शासनाने शाळेतील मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने नवीन इमारत मंजूर करून इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सरपंच बबनराव ढोबळे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
-बबनराव ढोबळे, सरपंच पारगाव