नागठाणे – सासपडे (ता.सातारा) येथील युवकास गंभीर जखमी करून फरारी झालेल्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वैभव साळुंखे (रा.नागठाणे), रोहित यादव (रा.अतीत), तुषार निशिकांत यादव (रा.सासपडे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुमारे अडीच महिन्यांपूर्वी केदार आप्पा यादव (रा.सासपडे) या युवकाला गावच्या यात्रेवेळी जुन्या खटल्याचा राग मनात धरुन लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी पट्टीने मारहाण करत, अंगावर गाडी घालून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यापैकी पाच संशयितांना त्यावेळी अटक झाली होती. तर 15 एप्रिलपासून या प्रकरणातील तिघे संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. काल दि.29 रोजी सकाळी 10 च्या दरम्यान संबंधित तीन संशयित नागठाणे परिसरात फिरत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. बोरगाव पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, पोलीस नाईक दादा स्वामी, बाळासाहेब जानकर, विशाल जाधव यांनी ही कारवाई केली.