रहिमतपूर -पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना गुजरवाडी (ता. कोरेगाव) येथील पैलवान कल्याण भोसले (वय 42) यांच्या वाहनाला लोधवडे गावाजवळ अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की गुजरवाडी येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नावजी गुंडा भोसले यांचे चिरंजीव कल्याण भोसले हे त्यांच्या मित्रासोबत सकाळी सहा वाजता पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. त्यानंतर दहा वाजण्याच्या दरम्यान लोधवडे गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे पैलवान कल्याण भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत प्रवास करणारे अण्णा घाडगे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासो थोरात (वय 42), सागर भोसले, विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50) व रुद्र भोसले हे जखमी झाले. जखमींवर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पैलवान कल्याण भोसले यांचा मुलगा रुद्र भोसले हा किरकोळ जखमी झाला असून अपघातानंतर तो वाहनाची पाठिमागील काच फोडून स्वत: बाहेर आला. त्यानंतर त्याने इतर जखमींनाही बाहेर येण्यास मदत केली. कल्याण भोसले यांच्या अपघाती मृत्यूमुळे गुजरवाडी, टकले, बोरगाव, किरोली गावामध्ये शोककळा पसरली आहे.