दरोडाप्रकरणी साताऱ्यात तीन आरोपींना अटक

सातारा – स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने तपास करत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन आरोपींना अटक केली. घरफोडीच्या गुन्ह्यात सचिन सुरेश हजारे (वय 22, रा. वाढे) व दरोड्यातील प्रकरणात महेश महादेव जाधव (वय 24, नावडी, ता. फलटण) व किरण लाला चव्हाण (वय 24, विंचुर्णी, ता. फलटण) या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर गवसणे आणि त्यांच्या पथकाला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार करंजे नाका सातारा येथे एक इसम ऍपे रिक्षामधून ऍल्युमिनिअम पट्ट्या घेऊन आल्याचे कळले. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टेंपोतील चालक सचिन हजारे याच्याकडे करून चौकशी केली तेव्हा वाढे गावाच्या हद्दीत श्रीराम ऍल्युमिनिअम ग्लास कंपनीतून चोरी केल्याची कबुली दिली. एक लाख रुपये किमतीच्या अडीचशे पट्टी हस्तगत करण्यात आल्या.

दुसऱ्या प्रकरणात दरोड्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासात जेरबंद केले. दि. 26 एप्रिल रोजी रात्री सव्वाबारा वाजता मांडवखडक, ता. फलटण येथे नितीन दादासो निकाळजे आपल्या कुटुंबीयासमवेत अंगणात झोपले होते. तेव्हा पाच अज्ञात लोकांनी तलवार व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून आईच्या गळ्यातील पस्तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. नितीन निकाळजे यांनी टोळक्‍यातील एकाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा चौघांनी नितीन व त्यांच्या भावाला दगडाने जखमी केले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे व शशिकांत मुसळे व पथकाने घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केली. तेव्हा महेश जाधव व किरण चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून होंडा प्रो गाडी जप्त करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.