निराशेतून तरुणाची मुख्यमंत्र्याकडे इच्छामरणाची परवानगी

पुणे – एका तरुणाने निराशेतून मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी पत्राद्वारे केली होती. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दत्तवाडी पोलिसांनी तातडीने संबंधित तरुणाची भेट घेऊन त्याचे समुपदेशन केले. त्याच्या सतत संपर्कात राहून त्याचे मनपरिर्वन करण्यात पोलिसांना यश आले. यामुळे तरुण निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आणि त्याने स्वत:हून मुख्यमंत्री कार्यालाला व्हॉटसऍपद्वारे इच्छा मरणाचा निर्णय मागे घेत असल्याचे कळवले.

यासंदर्भात माहिती देताना दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कम्युनिटी पोलिसींगचा कार्यभार संभाळणारे हवालदार श्रीकांत शिरोळे म्हणाले, सिंहगड रोड परिसरात एक सुशिक्षित तरुण मानसिकरित्या अत्यंत खचलेल्या मनस्थितीत होता. आई-वडिल वयस्कर आणि अंथरुणाला खिळलेले तसेच जवळ कोणतेच नातेवाईक नाहीत, अशी त्याची परिस्थिती आहे. यामुळे त्याने स्वत:च जीव संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्यापश्‍चात आई-वडिलांचे काय होणार, याची चिंता त्याला सतावत होती. यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. यापत्राची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. त्यांनी तातडीने पुणे पोलीस आयुक्तालयाला पत्र लिहून दखल घेण्यास सांगितले. संबंधित तरुण दत्तवाडी पोलिसांच्या हद्दीत रहात असल्याने पोलीस आयुक्तांलयाने दत्तवाडी पोलीस ठाण्यास पत्र पाठवले. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी याची तातडीने दखल घेतली. त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित तरुणाच्या सातत्याने संपर्कात राहून त्याच्या मनातले नकारात्मक विचार बदलून टाकले. यामुळे त्याच्या जीवनाची एक प्रकारे नवीन सुरवात झाली.

पोलिसांचे मानले आभार
आई-वडिलांचा एकूलता एक आहे, तसेच नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास आहेत. यामुळे नातेवाईकांशीही मन मोकळे करता येत नाही. परंतु, मी पोलिसांकडे मन मोकळे केल्याने मनातील नकारात्मक विचार बदलले गेले. माझ्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन मनातील आत्महत्येचा विचार बदलला गेला. याबद्दल संबंधित तरुणाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे व हवालदार श्रीकांत शिराळे यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.