सामाजिक कार्यकर्त्यांना धमकी; राज्यमंत्री कडू यांच्याकडे तक्रार

पिंपरी – नागरी समस्येविषयी अथवा माहिती अधिकार कायद्यांतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्जाला शासकीय अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जात आहे. याबाबत विचारणा केली असता शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारीची धमकी दिली जात असल्याची तक्रार भीम संग्राम सामाजिक संघटनेचे राहुल वडमारे यांनी केली आहे. कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा व अडीअडचणींबाबत सरकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाकडून कार्यकर्त्यास अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जनहिताच्या कामासाठी पाठपुरावा केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.

एखाद्या विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यास, अनेक घटनांमध्ये चौकशी न करता कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत जागेवर अटक केली जात आहे. याबाबींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर मिलिंद तायडे, विशाल सरोदे, दिपक ढावरे, उमेश वाघमारे, आनंद साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.