नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील संबंध मागच्या काही दिवसांपासून चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. मात्र या सर्वात पूर्व लडाख सीमेवर तैनात असलेल्या भारतीय आणि चिनी सैन्यासमोर निसर्गाचे सुद्धा मोठे आव्हान आहे. कारण आता या पँगाँग सरोवराच्या परिसरात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. ज्याचा परिणाम चीनच्या बाजूला दिसत आहे. फिंगर परिसरात पँगाँग टीएसओच्या उत्तर किनाऱ्यावरील उंचावरील भागात तैनात असलेल्या चिनी सैनिकांना हे वातावरण मानवलेले नाही.
चीनचे वैद्यकीय पथक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या काही सैनिकांना स्ट्रेचरवरुन जवळच्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसले आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. मागच्या दोन ते तीन दिवसात फिंगर फोर जवळच्या उंचावरील क्षेत्रात तैनात असलेल्या चिनी सैनिकांना फिंगर सहाजवळ उभारण्यात आलेल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
उंचावरील भागामध्ये तैनात असताना, जो शारीरिक त्रास होतो, त्यासाठीच पीएलएच्या सैनिकांना फिल्ड हॉस्पिटमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असे या अधिकाऱ्याने सांगितले. पँगाँग सरोवराच्या भागात आठ फिंगर म्हणजे आठ डोंगर आहेत. चिनी सैन्य फिंगर आठवरुन फिंगर चार पर्यंत आले आहे. ते फिंगर फोरवरुन मागे हटायला तयार नसल्यामुळे याच भागात सर्वात जास्त तणाव आहे.
पूर्व लडाखमध्ये फॉरवर्ड भागात दोन्ही बाजूंनी जवळपास एक लाख सैनिक आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. चिनी सैन्य फिंगर फोरच्या रिजलाइन जवळ आहे. तिथून भारतीय सैन्य फक्त काहीशे मीटर अंतरावर आहे. “१६ ते १७ हजार फूट उंचीवर प्रतिकुल वातावरणामुळे सैनिकांच्या प्रकृतीवर परिणाम होतो, आरोग्य समस्या उदभवू शकतात. कडाक्याचा हिवाळा अजून सुरु झालेला नाही. पुढच्या काही आठवडयात, महिन्यांमध्ये परिस्थिती अजून खराब होईल” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.