मुंबई – राज्यात मुंबईसह धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीत आज दिवसभरात नवीन 66 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आता धारावीतील करोनाबाधित रुगांची संख्या 1 हजार 28वर पोहोचली आहे. तसेच आता 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत आज आणखी 66 रुग्णांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण धारावीमधील विविध भागातील आहे. दिलासाची बाब म्हणजे, आज करोनाबाधित एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. प्रशासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण परिसरात घरोघरी जावून तपासणी करण्यात येत आहे. तसेच करोनाबाधित आढळलेला परिसर सील करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, मुंबईत 10 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 20 दिवसांनी 1 एप्रिल रोजी धारावीत करोनाचा पहिला रुग्णाची नोंद झाली होती. यानंतर धारावीत करोनाचा कहर वाढतच आहे.