पिंपरी – पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच आढळलेल्या दोन प्रवासी पक्ष्यांच्या दोन प्रजातींची नोंद शोधनिबंधाद्वारे जागतिक दर्जाच्या विज्ञान शोधपत्रिकेत प्रकाशित झाली आहे. पिवळी लिटकुरी (ग्रे हॅडेड कॅनेरी फ्लायकॅचर) आणि करड्या डोक्याची मैना (चेस्टनट-टेल्ड स्टार्लिंग) अशी या हिवाळी पक्ष्यांची नावे आहेत.
अलाईव्हचे पक्षी अभ्यासक उमेश वाघेला, प्रशांत पिंपळनेरकर, प्रदीप खैरे आणि निनाद रावते यांना पिवळी लिटकुरी आणि करड्या डोक्याची मैना हे हिवाळी पाहुणे पक्षी चिंचवड येथे पक्षी निरिक्षण करताना आढळून आले होते. याविषयीचे दोन शोधनिबंध इला फाउंडेशन आणि वन विभाग महाराष्ट्रद्वारा प्रकाशित इला जर्नल ऑफ फॉरेस्ट्री एन्ड वाईल्डलाईफ या जागतिक दर्जाच्या ई-शोधपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहेत.
पिवळी लिटकुरी हा फक्त9 सेंटीमीटरचा इवलासा पक्षी थेट हिमालयातून स्थलांतर करून उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात हिवाळ्यात हंगामी वास्तव्यास येतो. महाराष्ट्रात फक्त पश्चिम घाटात काही मोजक्या ठिकाणीच हा पक्षी क्वचित दिसल्याची नोंद आहे. दाट झाडीत राहणारा हा देखणा पक्षी कीटकभक्षी असून सुमधुर, कर्णप्रिय शीळ घालतो.
करड्या डोक्याची मैना हा इशान्य भारतातील रहिवासी पक्षी असून मध्य आणि पश्चिम भारतात हिवाळी पाहुणा म्हणून येतो. महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये सामान्यपणे कोकणात आणि इतर ठिकाणी क्वचित पाच ते सहाच्याच संख्येत आढळून आल्याची नोंद आहे. मात्र पिंपरी-चिंचवड परिसरात हा पक्षी चिंचवड येथे एकाच ठिकाणी शंभराहून अधिकच्या संख्येने आढळून आला. 20 सेंटीमीटरचा हा पक्षी नेहमी भोरडी मैना आणि ब्राह्मणी मैना यांच्या सोबत दिसतो. खुली झाडे आणि शेती परिसरात आढळणारा आणि फळे, मकरंद, कीटक खाणारा मिश्राहारी पक्षी आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात या आधी हे दोन्ही पक्षी आढळल्याची नोंद नाही. विशेष म्हणजे करड्या डोक्याची मैना या पक्ष्याची एवढ्या मोठ्या थव्यात पुणे जिल्ह्यातही यापूर्वी दिसल्याची नोंद नाही. अलाईव्ह संस्था जनजागृती, शिक्षण, संशोधन, दस्तावेजीकरण आणि प्रत्यक्ष संवर्धन या उपक्रमांद्वारे निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. संस्थे द्वारा 2007 सालापासून पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी करण्यात येत आहेत. आता त्या यादीत या दोन पक्षांची भर पडली असल्याचे अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला यांनी सांगितले.