पिंपरी – पुण्यातील चांदणी चौकात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातात दोन विद्यार्थी गंभीर तर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नुकतीच वाघोली परिसरात स्कूल बसला अपघात झाला होता. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस तसेच रिक्षांचा प्रश्न उपस्थित झाला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा पुन्हा एकदा चर्चा आला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ वर्षांचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुले ज्युनिअर के.जीमध्ये एमआयटी प्री स्कुल येथे शिकतात. बावधान परिसरात ही मुल राहण्यास आहेत. दरम्यान, त्यांचा रिक्षावाला नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्यांना परत घेऊन घरी सोडण्यासाठी जात होता.
रिक्षा चांदणी चौकातून भुगावकडे जाणाऱ्या भुयारी मार्गातून निघाली होती. पाठीमागे बसलेले विद्यार्थी गोंगाट करीत असल्याने रिक्षा चालकांना त्यांना गप्प बसा असे सांगण्यासाठी पाठी मागे वळला त्यावेळी समोर पंक्चर झालेला डंपर उभा होता. त्या डंपरला रिक्षाने पाठीमागून धडक दिली. अपघातात रिक्षातील दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. लागलीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
तर, इतर विद्यार्थी किरकोळ जखमी असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली