चिखली, जाधववाडीत बिबट्याची अफवा

परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचा वन विभागाचा निर्वाळा

पिंपरी – चिखली, जाधववाडी परिसरात बिबट्या सदृश्‍य प्राणी दिसल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. वन विभागाने शोध मोहिमेनंतर बिबट्या नसून उदमांजर असल्याची शक्‍यता वर्तविली आहे. बिबट्यासदृश्‍य प्राणी पुन्हा दिसल्यास माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

चिखली, जाधववाडी परिसरातील नागरिकांना सोमवारी रात्री बिबट्या सदृश्‍यप्राणी दिसला असल्याची माहिती मिळाली. सोशल मीडियावरुन ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरात रात्री अडीच वाजेपर्यंत शोध मोहीम राबवली. बिबट्याच्या पायाचे ठसे देखील वनविभागाला मिळाले नाहीत.

मंगळवारी सकाळी पुन्हा तज्ज्ञांनी परिसरात शोध मोहीम राबवली. आसपास असलेली मानवी वसाहत आणि औद्योगिक परिसरामुळे बिबट्या येणे शक्‍य नाही. वनविभागाला ज्यांनी माहिती दिली, त्यांनी स्वतः बिबट्याला बघितले नसून त्यांना कुणीतरी सांगितले होते. बिबट्या बघितलेला कोणीही नागरिक मिळाला नाही. ही अफवाच असल्याची शक्‍यता वन विभागाने वर्तविली आहे.

उदमांजर असण्याची शक्‍यता – बहिवाल
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, चिखली आणि जाधववाडी परिसरात कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यास बिबट्या त्या ठिकाणी जात नाही. नागरिकांना उदमांजर दिसले असल्याची शक्‍यता आहे. उदमांजर दिसल्याची शक्‍यता असली तरी देखील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.