हिंजवडी,(वार्ताहर) – चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी सालाबादप्रमाणे राहुल कलाटे फाउंडेशन आयोजित शहरातील पिंपरी-चिंचवड वुमेन्स प्रिमियर लीगच्या पर्व तीनला जल्लोषात सुरुवात झाली. वाकडमध्ये सुरू झालेल्या यंदाच्या पर्वात तब्बल 54 महिला संघांचा सहभाग असल्याने रंगतदार थरार क्रिकेट प्रेमींना अनुभवता येणार आहे. लीगचा पहिला सामना अटलांटे अचिव्हर्स व क्रिस्टल पार्क क्वीन्स यांच्यात झाला. 21 धावांनी अटलांटे संघाने विजयी सलामी देत आनंदोत्सव साजरा केला.
स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते जर्सी, भव्य ट्रॉफीचे अनावरण व खेळपट्टीचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण वडगामा, शंभू घशीटा उपस्थित होते. धकाधकीच्या युगात मानवी जीवनात खेळाला फार महत्त्व आहे. पण पूर्वीप्रमाणे हा खेळ म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही हे लक्षात घेऊन महिलांच्या खेळाला वाव मिळावा, त्यांच्या गुणांना चालना मिळावी तसेच त्यांना एक सक्षम प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच या खास महिला लीगचे आयोजन केले असल्याचे राहुल कलाटे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
शनिवारी आणि रविवारी साखळी सामने होणार आहेत. निलंजना शेट्टर, डॉ. स्वप्ना डांगमाळी, डॉ. अदिती थेऊरकर, पारूल जैन, अक्षय पाटील, पंकज पाटील, निलेश वालवरकर, निखिल सिनकर, शशांक सुर्वे, अजय तोडकर, ओम शेट्टी, ऋषी नीरपगारे, मयूर चिंचोरे यांच्यासह राहुल कलाटे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेचे संयोजन केले आहे.
आयटीयन्स तरुणींचा मोठा सहभाग!
यंदाच्या स्पर्धेत शेकडो आयटीयन्स तरुणी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणार्या परंतु वाकड परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक महिला व तरुणींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला असल्याचे दिसून आले.